गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

माझी कविता : मी ही अशी...

मी ही अशी...
स्त्री म्हणून जन्मले
देवाच्या या देणगीला
पुरेपूर जागले !

मी ही अशी...
कोमल काया म्हणून वाढले
आईच्या कुशीत
पान्ह्याला जागले  !

मी ही अशी...
वयातही आले
स्वतःच्या पायांवर
खोल-खोल रुतले   !

मी ही अशी...
बंधनात तृप्त झाले
नव्या नात्यांमधेही
स्वतःलाच शोधले   !

मी ही अशी ...
मातृत्वाला उरी घेतले
पंख मायेचे
पांघरून उरले   !

मी ही  अशी...
कर्तुत्वाने न्हाले
या पंखासाठी
आभाळही विस्तारले   !

मी ही अशी...
स्त्री म्हणून अभिमानाने जगले
जीवनाच्या या नदीत
स्त्री म्हणूनच लोप पावले   !

- राधिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा